उठ पंढरीच्या राजा
फार वेळ झाला
भूवैकुंठ पंढरीत बडवे उत्पातांचे हक्क संपुष्टात आल्यानंतर आता भुपाळी, काकडआरती, अभिषेक, अलंकारमहापूजा, धुपारती, नैवद्य, शेजारती इ. षोडशोपचारांवरही अनिर्बंध शासनाचे काटेकोर निर्बंध येणार यात नवल नाही. निधर्मी लोकशाही पद्धतीचे हे एक बरे असते. कुणीही यावे, काहीही मागावे आणि धर्मनिरपेक्ष मायबापसरकारने ते हवे तशा कायद्यात बसवून सोयीस्करपणे मान्यही करावे. मग या बेबंदशाहीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाने बळी पडावे; याचेही आश्चर्य वाटावयास नको. नाही तरी विठ्ठलासारख्या गोरगरिबांच्या देवाच्या वाट्यास हे यायचेच. बा पांडुरंगा, आता स्वार्थासाठी गरिबी श्रीमंतीच्या फुटपट्ट्या देवाला लावायलाही मागेपुढे न पाहणाऱ्या अभक्तांसाठी फार वेळ होण्यापूर्वी तरी एकदा डोळे उघडून बघशील का..? उठ पंढरीच्या राजा..!!
अठ्ठावीस युगांपासून कटेवर हात ठेवून विटेवर
उभे असलेल्या विठोबास आणखी काय काय सुखसोहळे पाहावे लागणार आहेत हे एक तो स्वतःच
जाणे..सुरवातीला पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर त्याला आजवर ताटकळत ठेवले, मग परकीय
आक्रमणांनी त्याला साळो की पळो करून सोडले, त्यानंतर मंदिरप्रवेशासाठी धरणे
धरणाऱ्या मानवतेच्या पुजाऱ्यांनी त्याला जंजरपट करून सोडले, फावल्या वेळात
बडवे-उत्पातांनी छळले आणि आता त्यांच्या
जाचातून मुक्त होतो न होतो; तोच गोरगरिबांच्या देवाला अलंकार पूजा कशासाठी..?
म्हणून शासनास वेठीस धरणाऱ्या तथाकथित संघटनांनी त्याचे उरले सुरले उपचार बंद
पडण्याचा खटाटोप चालविला आहे.
वास्तविक
पुरोगामी म्हणविणाऱ्या या संघटनांचा आणि विठोबाचा संबंध येतोच तो फक्त स्वार्थ
साधण्यासाठी..! नसता मानवनिर्मित गरिबी-श्रीमंतीच्या फुटपट्ट्या लावून पंढरीचा
विठोबा हा फक्त गोरगरिबांचा व कष्टऱ्यांचाच देव आहे असा जावाईशोध लावण्याचा रिकामा
उपद्व्याप करणारे महाभाग अभावानेच गवसायचे !! जर तसे असेल तर श्रीमंत व
अतिश्रीमंतांचा देव कोणता हे कुणी ठरवायचे ? पांडुरंगास रेशमी वस्त्र नेसाविल्याने
किंवा सोन्या चांदीचे अलंकार घातल्याने ती ठराविक वर्गाची मक्तेदारी ठरून त्यास
काठी, घोंगडी असा पोशाख द्यावा; अशी कुठल्याश्या ‘मुक्ती दलाची’ मागणी ही देवाला
एका माक्तेदारीतून दुसऱ्या मक्तेदारीत ढकलण्याची नसती उठाठेव ठरत नाही का ? आणि
गरीबांचा देव असला तरी गरिबास उंची वस्त्रे, अलंकार, खाद्ये आवडत नाहीत का ? जर
असतील तर मग ‘यथा देहे तथा देवे’ या सूत्रानुसार जर षोडशोपचारांनी देवाची
पूजा बांधली तर बिघडले कुठे..?
आणि हो..म्हणे
‘विठोबास वस्रे नेसवितांना होणारे पुरुषसुक्त पठण बंद करा !!’ का तर ते पुरुषप्रधान
संस्कृतीचे द्योतक असून २१व्या शतकात जगत असतांना त्याद्वारे पुरुषप्रधानसंस्कृती
रुजविली जाते. ही मागणी करण्या महाशयांच्या बुद्धीचे तर कौतुक करावे तेवढे
थोडेच..वेदोक्त पुरुषसुक्तात ज्याचे वर्णन आले आहे; ती एक अतिभव्य ईश्वरी संकल्पना
असून जाती-लिंगभेदातीत आहे; याची सामान्य कल्पनाही नसतांना केवळ शासननियुक्त
कर्मचाऱ्यांना ‘संस्कृत-पठन’ येत नाही; म्हणून अकलेचे दिवाळे काढीत विठ्ठलाचा
नित्योपचार बंद पडण्याचे महत्पाप करण्याची दुर्बुद्धी त्यांना व्हावी हेही
दुर्दैवीच म्हणावे लागेल.
भूवैकुंठ पंढरीत बडवे
उत्पातांचे हक्क संपुष्टात आल्यानंतर आता भुपाळी, काकडआरती,
अभिषेक, अलंकारमहापूजा, धुपारती,
नैवद्य, शेजारती इ. षोडशोपचारांवरही अनिर्बंध
शासनाचे काटेकोर निर्बंध येणार यात नवल नाही. निधर्मी लोकशाही पद्धतीचे हे एक बरे
असते. कुणीही यावे, काहीही मागावे आणि धर्मनिरपेक्ष
मायबापसरकारने ते हवे तशा कायद्यात बसवून सोयीस्करपणे मान्यही करावे. मग या
बेबंदशाहीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाने बळी पडावे;
याचेही आश्चर्य वाटावयास नको. नाही तरी विठ्ठलासारख्या गोरगरिबांच्या
देवाच्या वाट्यास हे यायचेच. म्हणूनच म्हणावेसे वाटते; “बा पांडुरंगा, आता स्वार्थासाठी
गरिबी श्रीमंतीच्या फुटपट्ट्या देवाला लावायलाही मागेपुढे न पाहणाऱ्या अभक्तांसाठी
तरी, फार वेळ होण्यापूर्वी एकदा डोळे
उघडून बघशील का..?”
.png)

