Saturday, August 24, 2013

डोईचा पदर आला खांद्यावरी..



डोईचा पदर आला खांद्यावरी..

     बदलत्या काळानुसार दाराला उंबरठा राहिला नाही, घराला आंगण राहिलं नाही, गावाला वेस राहिली नाही, विसाव्या शतकात स्त्रीच्या डोईवरून दुहेरी खांद्यावर आलेला पदर हळूहळू एकेरीवर आला आणि कालौघात दिसेनासा झाला. या दुर्दैवी बदलांमुळे झालेले दुःखद परिणाम आपण आज अगदी दिल्ली ते गल्ली व्हाया मुंबई भोगत आहोत. जे जे पुरुष करतो ते ते स्त्रीने केले पाहिजे व हे तिने सदैव सिद्ध करत राहिले पाहिजे अशाप्रकारच्या अट्टहासालाच जर आपण समता म्हणत असू तर उद्याचालून आपणास याहीपेक्षा भीषण प्रकारांना सामोरे जावे लागेल.


 काही दिवसांपूर्वी स्त्रियांवरील अत्याचारांनी दिल्ली हादरली. कालपरवा मुंबईतही तेच घडले. कमीअधिक प्रमाणात देशात अन्यत्रही बलात्काराचे प्रकार चालूच आहेत. अशी घटना घडली की काही काळ तिचे तीव्र (?) पडसाद उमटतात, जनमत संतापते, सरकार अडचणीत येते, माध्यमे ब्रेकिंग न्यूज म्हणून काथ्याकुट करतात, आरोपी पकडले जातात व कालांतराने सुटतातही पण असले प्रकार वारंवार का घडतात याचा विचर करायला आजच्या धावत्या जगात कुणालाच वेळ नसतो. ही घटना जोपर्यंत समाजात घडत असते तोपर्यंत देशातील सुजाण नागरिकांसाठी ती केवळ एक ‘बातमी’ असते, मग आगदी तो ती बातमी जगासमोर आणणारा बातमीदार असला तरीही..!! परंतु मुंबईतील एका   प्रसारमध्यमाच्या २३ वर्षीय महिला छायाचित्रकारावरील अत्याचाराची घटना तीच गोष्ट जर जीवावर बेतली तर काय कठोर अनुभव येतो याचे प्रतिनिधित्व करते व विचार करण्यास भाग पडते.

       म्हणूनच एकविसाव्या शतकात स्त्रीपुरुष समानतेचा डांगोरा पिटणाऱ्या कोतवालांनी त्यांच्या हटवादीपणाचा पुनर्विचार करण्याची आता खरी वेळ आली आहे. जे जे पुरुष करतो ते ते स्त्रीने केले पाहिजे व हे तिने सदैव सिद्ध करत राहिले पाहिजे अशाप्रकारच्या अट्टहासालाच समता मानण्याची विकृत प्रवृत्ती बळावत चालली आहे. केवळ पुरुषाशी स्पर्धा म्हणून जर आजची स्त्री घराबाहेर पडत असेल व आम्ही त्याला समता म्हणत असू तर उद्याचालून आपणांस याहीपेक्षा भीषण प्रकारांना सामोरे जावे लागेल. आज स्त्रीमन, स्त्रीशिक्षण व  स्त्रीजीवनाच्या बाबतीत इतर क्षेत्रांप्रमाणे विलक्षण ओढून नेणाऱ्या प्रवाहाकडे पाहणे अशक्य झाल्याने आपण डोळे मिटून वाहवले जात आहोत. कदाचित गाडीने रूळ बदले असतील पण तिचा खडखडाट अद्यापही थांबलेला नाही हे बलात्कारासारख्या बीभत्स प्रकारांवरून सिद्ध होत आहे. बुद्धीच्या बाबतीत स्त्री पुरुषाची बरोबरी कारीलही, पण तिच्या भावना पुरुषांपेक्षा थोड्या निराळ्या आहेत. निसर्गानेच तिला तशी घडविली आहे. आजच्या यंत्रयुगात स्त्रीला स्वावलंबी होणे पूर्वीपेक्षा जास्त शक्य झाले असले तरी केवळ स्वावलंबनाने तिचे जीवन पूर्ण होवू शकत नाही. पुरुष पराक्रमावर दीर्घकाळ संतुष्ट राहू शकतो पण स्त्रीमन केवळ पराक्रमावर व स्वातंत्र्यावर  समाधानी असूच  शकत नाही.  स्त्रीला स्वातंत्र्याहूनही प्रीती व वात्सल्याचे अधिक आकर्षण असते. यात तिचा कमीपणा मुळीच नाही असला तर मोठेपणाच आहे.

          स्त्रीजीवनाची ही सारी जडनघडण लक्षात घेवूनच भारतीय संस्कृतीने स्त्रीच्या जीवनाला काही मर्यादा आखून दिल्या आहेत. पण पाश्चत्य संस्कृतीच्या झगमगाटात मिरवण्याच्या स्त्रीहट्टापायी तिने त्या आततायीपणाने कधीच ओलांडल्या आहेत. ती आज निसर्गाच्या अनेक बंधनातून निसर्गतःच मुक्त असणाऱ्या पुरुषाची अगदी व्यवसायापासून व्यसनाधीनतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करू पाहते आहे. फक्त पुरुषासारखी वेशभूषा व केशभूषा करूनच समानता साधते असे तिचे मत असावे. या स्वैराचारामुळे आपण आपले स्वत्व स्त्रीत्व आणि अस्तित्व गमावीत आहोत याचे तिला भान उरलेले नाही. म्हणूनच तिला “Lady, you are not a man..!” असे सांगण्याची वेळ अपूर्वा पुरोहित नावाच्या लेखिकेवर आली असावी.

आज स्त्री स्वतंत्र आहे. तिला स्वतंत्र कायद्यांचे पाठबळ आहे. असे असूनही ती असुरक्षित आहे. तिला संविधानाने समता दिली असेलही पण संस्कृतीने तिला दिलेली सुरक्षा व सन्मान ही विलक्षण मुल्ये आजची स्त्री गमावून बसली आहे. कारण “पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने” असं म्हणणारा व “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” असं म्हणून पुरुष हा जर परमेश्वराची कीर्ती असेल तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे हे सांगणारा मनू आम्हाला सनातनी वाटतो. आम्हाला साडीचा पदर डोईजड होतों व तोंड लपवून नको ते करायला साथ देणारा स्कार्फ  मॉडर्न वाटतो. सौभाग्याचं लेणं असलेलं ठसठशीत कुंकू नको वाटतं व मॅचींगची हिरवी किंवा निळी टिकली फॅशनेबल वाटते. पंजाबी सलवार कमीज रुऽऽड वाटतो आणि स्लीवलेस टॉप आणि तंग जीन्स घालून  मोकाट हुंदडायला जास्त आवडते.

नदी जोवर तिचा काठ ओलांडत नाही तोवर शांत व वंदानियच असते, परंतु तिने मर्यादा ओलांडली की तिचे स्वरूप बदलत असले तरी त्याला ‘पूर’ म्हणतात समुद्र नव्हे. शिवाय पुरामुळे होणारे नुकसान पुढेमागे भरून काढता येते पण समाजच नसला तर हाती काहीच शिल्लक उरत नाही. समईत वातीच्या रूपाने तेवणारी मंद ज्योत ही आगच खरी, ती देवघरात असेपर्यंत शांत प्रकाश देते;  पण तिनेच जर  मशालीचे रूप घेतले तर मग असा कालपरवासारखा भडका उडतो. तो विझवायला केवळ  कायदे समर्थ ठरत नसतात. तपास काढत खूप मागे जावे लागते. तेंव्हा कुठे  गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, सुकन्या, अनसूया, मुक्ताई, जनाई, मीरा, सखू, कान्होपात्रा, सोयराई, वेणाक्का, जिजाऊ, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई, सावत्री, आनंदी इत्यादींपासून आगदी अलीकडच्या सिंधुताई, अपर्णाताई  यांचे कुळगोत्र सापडते. त्यांच्यात ममताळू माता, प्रेमळ पत्नी, राजस राणी, कणखर कन्या, बळकट बहिण, संयमी सासू आणि सोशिक सून हे स्त्रीजीवानाला कृतार्थ करणारे सप्तरंग सापडतात. मग त्या रंगातला एखादा रंग जरी  पुसटसा वेचता आला  तर ‘चार दिवस सासूचे’ संपतात, ‘मला सासू हवी’ म्हणत दाराबाहेर पडलेलं ‘पुढचं पाऊल’ मागे येतं,  ‘या गोजिरवाण्या घरात - उंच माझा झोका’ म्हणत ‘अवघाची हा संसार’ सुखाचा होतो आणि  स्त्रीजन्माचं खरखुरं सार्थक होतं..

No comments:

Post a Comment